गुटखा तस्करी करणारा दुचाकीस्वार जेरबंद

Spread the love

पूर्णा पोलिसांची खुजडा शिवारात कारवाई; दुचाकीसह सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

परभणी/पूर्णा, ता. २७ (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या दुचाकीस्वारास पूर्णा पोलिसांच्या पथकाने खुजडा शिवारात जेरबंद केले. आरोपीकडून प्रतिबंधित गुटख्यासह दुचाकी व अन्य साहित्य असा एकूण ४९ हजार ८०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पूर्णा तालुक्यातील मौजे खुजडा शिवारात खुजडा-मिरखेल रोडवर ही कारवाई गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.     

 या बाबत अधिक माहिती अशी की,लक्ष्मण शामराव बनसोडे (वय २७, रा. पिंगळी, ता. जि. परभणी) हा आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवर (क्र. एमएच २२ एएक्स ९८८६) प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गस्तीवरील फौजदार अजय किरकन, जमादार आनंद सोनकांबळे व पो.काॅ. राम मोरे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित दुचाकीस्वारास ताब्यात घेतले. त्याच्याजवळील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.कारवाईत राजनिवास सुगंधित पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको किंग पॅक, प्रीमियम केएन-०१ जाफरानी जर्दा तसेच आरएमडी पान मसाला आदी प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. गुटख्याची किंमत सुमारे २० हजार रुपये, तर ३० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि दोन काळ्या रंगाच्या बॅग असा एकूण ४९ हजार ८०४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.     या प्रकरणी जमादार आनंद गणपतराव सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गुटखा तस्कर लक्ष्मण बनसोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय किरकन करीत आहेत.

You cannot copy content of this page