तहसील परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर; राज्य मार्ग मोकळा!

Spread the love

न्यायालयाच्या आदेशानंतर पूर्णेत राज्य मार्गावरील ४८ अतिक्रमणे निष्कासित; २० वर्षांपासूनच्या अतिक्रमणांचा अखेर सफाया

पूर्णा,ता.२७( प्रतिनिधी) :

(Encroachments on the state highway removed)न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राज्य मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केली असून, गुरुवारी (ता. २७) पूर्णा तहसील कार्यालय परिसरात धडक कारवाई करण्यात आली. तब्बल २० वर्षांपासून उभी असलेली छोटी-मोठी अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने बुलडोझरचा वापर केला. या कारवाईत राज्य मार्गालगतची तब्बल ४८ अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली असून, अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या मार्गाला अखेर मोकळा श्वास मिळाला आहे.

      नांदेड-पुर्णा-ताडकळस-सिंगणापूर राज्य मार्ग क्रमांक ६१ हा तहसील कार्यालय परिसरातून जातो. तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या सुमारे दोन दशकांत या परिसरात विविध स्वरूपाची छोटी-मोठी शेड, टपऱ्या व इतर बांधकामे उभारण्यात आली होती. दिवसेंदिवस वाढत गेलेल्या या अतिक्रमणांमुळे राज्य मार्ग अरुंद होत होता. परिणामी वाहनचालकांसह नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

     या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य मार्गांवरील अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने पूर्णा तहसील परिसरातील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली.कारवाईपूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना सुमारे आठ दिवसांपूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही नागरिकांनी चार दिवसांपूर्वीच स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. मात्र, उर्वरित अतिक्रमणांवर गुरुवारी प्रशासनाचा बुलडोझर चालला.

      या कारवाईदरम्यान अप्पर तहसीलदार प्रशांत थारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, पो. नि. बेंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय देशपांडे यांच्यासह नगरपालिकेचे मुनतेजीब खान व कर्मचारी, मंडळ अधिकारी टेकाळे, तलाठी मारडे फौजदार श्रीनिवास पडलवार,अजय किरकण व आमेर चाऊस तसेच इतर महसूल ,सा.बां विभाग,पालीकेचे कार्यालयीन कर्मचारी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस, होमगार्डचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.तहसील कार्यालय परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न या कारवाईमुळे मार्गी लागला आहे., पूर्णा शहरासह राज्य मार्गावरील उर्वरित अतिक्रमणांवरही प्रशासन अशीच कठोर कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page