परभणीच्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री मोदी यांनी साधला संवाद
वनामकृवित “खेलो इंडिया संवाद” कार्यक्रमाचे प्रक्षेपण
परभणी/प्रतिनिधी
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती(२९ ऑगस्ट क्रीडा दिवस) या उद्देशाने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी गुरूवारी(दि. २७)आभासी माध्यमातून युवकांशी संवाद साधला. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि मेरा युवा भारत परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेलो इंडिया संवाद : खेल की बात, पीएम के साथ – युवा कनेक्ट’ या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मेदी यांनी परभणीच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला.
कार्यक्रमास खासदार संजय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाइन माध्यमातून अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर तसेच टेबल टेनिसमधील राष्ट्रीय खेळाडू शिवानंद पुरी यांचीउपस्थिती होती. यावेळी खासदार संजय जाधव यांनी, ‘सशक्त भारत, नशामुक्त भारत’ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही आई-वडिलांची अपेक्षा आपल्या पाल्याने सुसंस्कृत होऊन मोठे अधिकारी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मार्गदर्शनातलकुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी, युवक हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचे घटक असून, देशाचे यश आणि अपयश हे युवकांच्या शक्तीच्या योग्य वापरावर अवलंबून आहे. युवकांकडे मोठी ऊर्जा आणि क्षमता आहे; तिचा योग्य दिशेने उपयोग केला पाहिजे, असे सांगितले.
प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन विद्यापीठाचे क्रीडा शिक्षक डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले, तर आभार जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. बसलिंगाप्पा कलालबंडी, डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ. शंकर पुरी, संगणक प्रभारी अधिकारी डॉ. संतोष फुलारी तसेच मेरा युवा भारत कार्यालयाचे गजानन गाडेकर, समन्वयक दीपक खुळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.










