टायर्सच्या दुकानातून २५ हजार पळविले!
पूर्णेतील बसस्थानक परिसरातील घटना; चोरट्यांच्या वाढत्या धाडसाने पोलिसांना टेन्शन; चोरटा सीसीटीव्हीत कैद
पूर्णा / प्रतिनिधी :
पूर्णा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, आता चोरट्यांनी ऐन बसस्थानक परिसरातील दुकानाला लक्ष्य केले आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शेख नवाज भाई यांच्या ‘नवाज टायर्स’ दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील सुमारे २५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची प्रार्थमिक माहिती आहे. चोरीची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मागील अडीच महिन्यांत शहरात घडलेल्या सात ते आठ घरफोडी, चोरी आणि दुकानफोडीच्या घटनांचा तपास अद्याप प्रलंबित असतानाच पुन्हा दिवसा चोरी झाल्याने पोलिसांचे टेन्शन आणखीनच वाढले आहे.
पूर्णा शहरातील माजी नगराध्यक्षांच्या घरांसह विविध भागांत मागील दोन ते अडीच महिन्यांत चोरट्यांनी घरफोडी, दुकानफोडी आणि चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र, या घटनांतील चोरट्यांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जुन्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी पुन्हा एकदा वर्दळीच्या ठिकाणी हात साफ केल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरातील नवाज टायर्स दुकानात शिरलेल्या अज्ञात चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. विशेष म्हणजे, चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी दुकान मालक शेख नवाज यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पूर्णा पोलीस ठाण्यात धाव घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
—————————–
चोरटे सोकावलेत..?
मागील चोरीच्या घटनांचा उलगडा झाला नसल्याचे शहरात चोरी करण्यासाठी चोरटे सोकावलेत असल्याचे दिसून येत आहे.दिवसेंदिवस त्यांचे धाडस वाढतच असल्याचे चित्र आहे.स्थानिक पोलीसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवून चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे आवहान घ्यावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.










