बळीराजा साखरने दिला ऊसाला प्रतिटन ३ हजार १२८.५८ रुपयांचा भाव!

Spread the love

चेअरमन शिवाजीराव जाधव यांची माहिती;गतवर्षीच्या हंगामात तिसरी व अंतिम उचल ४०३.५८ रुपये प्रतिटन; २९ कोटी ९१ लाख ५१ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार;यंदाचा गळीत हंगाम १२ ऑक्टोबरपासून

पुर्णा/ प्रतिनिधी :

बळीराजा साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये एकूण ७ लाख ४१ हजार ९७७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ७० हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या हंगामात सरासरी साखर उतारा १९.८४ टक्के मिळाला असून, शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे प्रतिमेट्रिक टन ३ हजार १२८.५८ रुपये दर अदा करण्यात येत आहे. त्यानुसार उसाच्या बिलाची तिसरी व अंतिम उचल प्रतिमेट्रिक टन ४०३.५८ रुपये असून, एकूण २९ कोटी ९१ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

बळीराजा कारखान्याने यापूर्वी शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिमेट्रिक टन २ हजार ५०० रुपये, तर दुसरी उचल २२५ रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे अदा केली आहे. आता तिसरी व अंतिम उचल ४०३.५८ रुपये प्रतिटन दिल्यानंतर हंगाम २०२५-२६ साठी एकूण ३ हजार १२८.५८ रुपये प्रतिमेट्रिक टन भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. मागील हंगामासाठी अंदाजित २ हजार ९५० रुपये प्रतिटन दर जाहीर करण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात ३ हजार १२८.५८ रुपये प्रतिटन असा उच्चांकी दर देण्यात येत असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.

दरम्यान, गळीत हंगाम २०२६-२७ साठी कारखान्याच्या शेतकी विभागाकडे ११ हजार ३५१.०५ हेक्टर क्षेत्रावरील उसाची नोंद झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गाळपाबाबत चिंता करू नये. सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर बिगरसभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणण्यात येईल, असेही कारखान्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी गव्हाण पूजन करून गळीत हंगाम २०२६-२७ चा प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात येणार आहे. याच दिवशी आगामी हंगामाचा उच्चांकी ऊसदर जाहीर करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव जाधव आणि कार्यकारी संचालक मा. श्री. अजय शिवाजीराव जाधव यांनी सांगितले आहे. सर्व ऊस पुरवठादार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page