Hingoli;भव्य रोजगार मेळाव्यात २२५ युवकांना नोकरीची संधी

Spread the love

300 हून अधिक उमेदवारांचा सहभाग; हिंगोलीत लवकरच कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र उभारणार-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, प्रतिनिधी :
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात सुमारे 300 युवक-युवतींनी सहभाग घेतला असून, प्राथमिक मुलाखतीनंतर 225 उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स देण्यात आल्या.

मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यशवंत कलेपवार, ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे तसेच विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी युवकांनी रोजगारासाठी केवळ आपल्या गावापुरता किंवा जिल्ह्यापुरता विचार न करता राज्यातील आणि देशातील उपलब्ध संधींचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. बाहेर जाऊन काम केल्याने कौशल्य, अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो, तसेच आर्थिक स्वावलंबनाची नवी दारे खुली होतात, असे त्यांनी सांगितले.मेळाव्यात महाराष्ट्रातील 20 हून अधिक नामांकित उद्योग व कंपन्यांनी सहभाग नोंदवून उत्पादन, सेवा, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. मुलाखतीनंतर 225 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यातील बहुतांश उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी मिळाली.

यावेळी संजय काटकर यांनी हिंगोली येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. या केंद्रामुळे युवकांना स्थानिक पातळीवर उच्च शिक्षण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रा. कैलास मोरे यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबत उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगत, प्रस्तावित केंद्रामुळे हिंगोली जिल्ह्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

युवाशक्ती फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी भविष्यातही अशा रोजगार मेळाव्यांचे सातत्याने आयोजन करून अधिकाधिक युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधत मुलाखती दिल्या आणि करिअर मार्गदर्शनाचाही लाभ घेतला. युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम हिंगोली जिल्ह्याच्या रोजगार चळवळीतील महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page