रेल्वे उड्डाणपुलाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी
हिंगोली रस्त्यावर पुर;वाहतुकीस अडथळा; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
हिंगोली, १५ जुलै प्रतिनिधी :
हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ नगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही तासांपासून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात चिखल निर्माण झाला असून नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीला पडलेल्या भगदाडातून सतत पाण्याचा जोरदार प्रवाह बाहेर पडत आहे. परिणामी रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून पादचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम असताना, दुसरीकडे लाखो रुपयांच्या खर्चाने शुद्ध केलेले पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही गळती वेळेत दुरुस्त न झाल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून गळती बंद करावी, जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची होणारी नासाडी रोखावी आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.









