दवाखान्याची तोडफोड महागात; आरोपीची एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायम
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय; पाच हजारांचा दंड, फिर्यादीला नुकसानभरपाईही कायम
परभणी,१५ जुलै(प्रतिनिधी) :
गंगाखेड येथील एका खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यात घुसून तोडफोड व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. आरोपीला एक वर्षांची साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा कायम ठेवत अपील फेटाळून लावण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, गंगाखेड शहरातील योगेश्वर कॉलनी परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. खाजा खाँ युसुफ खाँ यांच्या दवाखान्यात आरोपी सय्यद अर्शद सय्यद दाऊद (रा. ममता कॉलनी, गंगाखेड) याने घुसून गोंधळ घालत दवाखान्यातील मालमत्तेची तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी १६ मे २०१० रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, गंगाखेड येथे झाली. न्यायालयाने आरोपीला एक वर्षांची साधी कैद, पाच हजार रुपये दंड तसेच फिर्यादीस चार हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाविरोधात आरोपीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीपुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत आरोपीचे अपील फेटाळून लावले आणि मूळ शिक्षा कायम ठेवली.या खटल्यात जिल्हा सरकारी वकील डी. यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. डी. वाकोडकर यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. बी. पौळ तसेच गंगाखेड न्यायालयातील पैरवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.










