११ केव्ही वाहिन्या घरांवर कोसळल्या;पूर्णा शहराचा वीजपुरवठा ७ तासांपासून ठप्प

Spread the love

मोठी जीवितहानी टळली; भवानी माता मंदिर परिसरातील प्रकार, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी नागरिकांचा आग्रह

पूर्णा,ता.२६(प्रतिनिधी) :

पूर्णा शहरातील भवानी माता मंदिर सबस्टेशन येथून आनंदनगर, आदर्श कॉलनी, बाजारपेठ, मस्तानपुरा, गवळी गल्लीसह शहराच्या मोठ्या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही विद्युत वाहिन्या शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक तुटून घरांवर कोसळल्या. यावेळी मोठा स्फोट होऊन स्पार्किंग झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका पत्र्याच्या घरावर वाहिनी पडल्याने पत्रे जळून नुकसान झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

     पुर्णा शहरातील भवानी माता मंदिर सब स्टेशन परिसरात शनिवारी (ता.२६) रोजी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच  महावितरणच्या उप कार्यकारी अधिकारी पांचाळ व शहर अभियंता पाटील यांनी  कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, मागील २ते३ महिन्यांत  याच परिसरात विद्युत वाहिन्या तुटणे, डीपी जळणे यांसारखे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मुख्य वसाहतीतून जाणारी ११ केव्ही वाहिनी कायमस्वरूपी स्थलांतरित करावी आणि त्याबाबत महावितरणने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी करत नागरिकांनी वाहिन्या जोडण्यास विरोध केला. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा सुमारे सात तासांपासून खंडित राहिला.

        भवानी माता मंदिर सबस्टेशन वरील आनंदनगर फिडरवर सातत्याने निर्माण होणाऱ्या बिघाडाबाबत यापूर्वीही स्थानिक माध्यमांनी फिडरवरील वाढत्या भाराचा मुद्दा उपस्थित केला होता. गणेशोत्सवातही नागरिकांना वारंवार वीजखंडित होण्याचा सामना करावा लागला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकातही विद्युत वाहिन्या तुटण्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने धोकादायक वाहिन्यांची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page