‘श्री’ विसर्जनाचा पूर्णेत नयनरम्य सोहळा!

Spread the love

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाला प्राधान्य; धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक देखाव्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

पूर्णा, ता. २६ (प्रतिनिधी) :
दहा दिवसांच्या भक्तिमय गणेशोत्सवानंतर पूर्णा शहरात लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने काही गणेश मंडळांनी साधेपणाने विसर्जन केले, तर विविध मंडळांनी धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक तसेच समकालीन विषयांवरील आकर्षक देखावे साकारून मिरवणुकीची रंगत वाढवली. सायंकाळी मुख्य मिरवणुकीला सुरुवात होताच ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले.
पुर्णा शहरात दुपारपासूनच ‘श्री’, विसर्जनास प्रारंभ झाला आडत व्यापारी गणेश मंडळाने उत्साहात गणरायाला निरोप दिला. मात्र दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री दत्त गणेश मंडळाने अत्यंत साधेपणाने विसर्जन केले. श्री अष्टविनायक, एकता, त्रिशूळ, सुवर्णकार, श्रीराम यांसह विविध मंडळांनी आपापले देखावे सादर केले. श्रीराम गणेश मंडळाने भगवान विष्णूच्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविले, तर काही मंडळांनी द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग साकारला. श्री पूर्णेश्वर गणेश मंडळाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर आधारित देखावा विशेष आकर्षण ठरला. श्री शिवाजी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकालाच्या भव्य प्रतिमेनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यंदाच्या मिरवणुकीत सामाजिक प्रश्नांनाही प्रभावीपणे मांडण्यात आले. श्री मल्हार गणेश मंडळाने अन्न भेसळीच्या गंभीर समस्येवर जनजागृती करणारा देखावा सादर केला. श्रीराम गणेश मंडळाने अजितदादा पवार यांच्यावर आधारित देखावा मांडला, तर श्री अष्टविनायक गणेश मंडळाने शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीचे वास्तव अधोरेखित केले. श्री त्रिशूळ गणेश मंडळाने आषाढी पालखी सोहळ्याचे सादरीकरण करून महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे दर्शन घडविले. ओम गणेश मंडळ तसेच श्री छत्रपती संभाजी गणेश मंडळानेही धार्मिक विषयांवरील देखावे सादर केले.

हे विविधरंगी देखावे पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महिला, बालके, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. श्रद्धेबरोबरच सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांची व्यथा, इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिबिंब या सादरीकरणांतून उमटल्याने यंदाचा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला.विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने सोय करण्यात आली होती.पालीकेने विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. दहा दिवसांच्या उत्सवानंतर बाप्पाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाले. **‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’**च्या जयघोषात लाडक्या गणरायाला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.
—-_________________

पोलिसांचा चोख बंदोबस्त

विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

You cannot copy content of this page