रेल्वे पोलिस,रेसुबलाचा नाकर्तेपणा; शस्त्राचा धाक दाखवून धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटले
पुर्णा ते परभणी दरम्यानची घटना; तिरुपती ते साईनगर एक्सप्रेस मधील प्रकार;सोन्या-चांदीच्या दागिने,मोबाईल लंपास:प्रवाश्याद्वारे तीव्र संताप व्यक्त
पुर्णा ता.२७(प्रतिनिधी);
तिरुपतीहुन शिर्डीकडे धावणाऱ्या साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर एका शसस्त्र टोळीने बुधवारी पहाटे सव्वाचार ते पाचच्या सुमारास पूर्णा ते परभणी या दरम्यान रेल्वेच्या दोन बोगद्यांमध्ये घुसून प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल असा लाखों रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची माहीती आहे.प्रवाशशांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा-यावर असल्याने प्रवाशांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
तिरुपती ते साईनगर(गाडी क्र.१७४१७ ) एक्सप्रेस गाडीने पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी पूर्णा रेल्वे स्थानकास सोडले, त्यावेळी या एक्स्प्रेसच्या बोगी क्र.८ व बोगी क्र.१० मध्ये दरोडेखोरांची टोळी घुसली, या चोरट्यांनी साखर झोपेतील प्रवाशांना चाकूसह धारदार शस्त्रांचा धाक दाखवला. महिला व पुरुष प्रवाशांकडील सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेतले. मोबाईलही लंपास केले. सुमारे १५ते २० मिनिटे चोरटे या बोगीत धुमाकूळ घालत होते. तेव्हा या बोगीत रेल्वे सुरक्षा दलाचा एकही कर्मचारी धावून आला नाही. प्रवाशांनी मोठी ओरड केली, माञ उपयोग झाला नाही.जवळपास आठ ते दहा तोळे सोने तसेच दहा ते पंधरा मोबाईल व या चोरट्यांनी लंपास केले. परभणी रेल्वे स्थानक येण्यापूर्वी हे चोरटे डब्यातून उतरून फरार झाले.
परभणी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस दाखल झाल्याबरोबर संतप्त प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली व आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांच्या कडील दागदागिने व मोबाईल चोरीस गेल्याबद्दल काहींनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिसांनी ठाण्यामध्ये येऊन नोंद करा असा आग्रह धरला, तेव्हा प्रवाशांनी तक्रार नोंदणी ऐवजी रेल्वे गाठून पुढील प्रवास सुरू केला .
दरम्यान प्रत्यक्षदर्शनी दिलेल्यामाहिती नुसार प्रवाशात प्रचंड दहशतीचे वातावरण होते.रेल्वे पोलिसांनी यातील काही प्रवाशांच्या तक्रारींची नोंद केली. मात्र खुलासा केला नाही.वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी याबद्दल तपशील गोळा करत होते.दरम्यान या मार्गावर या पद्धतीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत परंतु त्या मागील चोरट्यांची टोळी अद्यापही रेल्वे पोलिसांच्या हाती आली नाही हे दुर्दैव आहे.
लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा मागील काही महिन्यांपासून नाकर्तेपणा वाढला आहे. जागोजागी रेल्वे स्थानक परिसरात गुटखा,गांजा,दारु विक्री सज्ञ चोरटे सक्रिय झाले आहेत.यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा-यावर पडली आहे.रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठांनी यात लक्ष घालून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तरी या ना कर्त्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.












