झिरोफाटा टोलनाक्याजवळ अपघात;दुचाकीस्वाराचा मृत्यू

Spread the love

भरधाव आयशर-दुचाकीत जोरदार धडक;दोघे गंभीर जखमी, पूर्णा पोलिसांत घटनेची नोंद

पूर्णा, ता. १६ (प्रतिनिधी) :

झिरोफाटा येथील टोलनाका परिसरात शनिवारी (ता. १५) रात्री दुचाकी आणि भरधाव आयशरची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अनुप अजित होरो (वय २३, रा. कथपवारी, जि. रांची, झारखंड) हा आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच २१ बीबी ४३३१ वरून झिरोफाटा येथून परभणीकडे जात होता. झिरोफाट्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला एमएच ०३ सीपी ७५०१ क्रमांकाच्या भरधाव आयशरने जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक बेंद्रे, फौजदार श्रीनिवास पडलवार, पोलीस हवालदार बंडू राठोड, गोविंद गिते व संजय देवकते यांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अनुप होरो यास मृत घोषित केले.या अपघातात बिपीन निखील कोरकेत्ता (वय २२) व मानो. एल. बेनेदिक कोरकत्ता (वय १९), दोघेही रा. मानोला, जि. गुमला, झारखंड, हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणाची नोंद पूर्णा पोलिसांनी केली असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास पूर्णा पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page