पोलिसी कर्तव्यात कसूर करणाऱ्या चौघांना केले निलंबित
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेश;पिंपळदरी, बोरी पोलिसांतील कर्मचा-यांचा समावेश
परभणी,ता.१३/प्रतिनिधी
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी कामात कसूर आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तडकाफडकी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
पिंपळदरी पोलिसांना डायल ११२वर कॉल आला होता. पोलीस ठाणे हद्दीत गोवंशाच्या तस्करीबाबत या कॉलवर माहिती देण्यात आली. त्यानुसार कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी प्रतिसाद देत घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या कारवाईत गोवंश प्रकरणातील एक वाहन पोलिसांनी सोडल्याचा ठपका ठेवत पिंपळदरी पोलिसांतील पोलीस हवालदार मुंजा पायघन, पोलीस अंमलदार मुंजाजी पवार आणि पोलीसचालक गजानन फुगणर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पुढील आदेशापर्यंत निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. तर बोरी पोलिसांतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल लाड यांनी केवळ पोलिसांनाच मिळालेली गोपनीय माहिती उघड केल्याचा ठपका ठेवला आहे. याप्रकरणी विशाल लाड यांना निलंबित करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या या तडकाफडकी निलंबन कारवाईने परभणी पोलीस दलात कमालीची शांतता पसरली आहे.











