पुर्णेत खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची ‘लूट’.!

Spread the love

शेतकऱ्यांच्या मजबुरीवर नफा; युरियाची २६६ रुपयांची बॅग ३५० ला, डीएपीवरही ‘वरकमाई’; कृषी विभागाचे दुर्लक्ष

पुर्णा, ता. १० (प्रतिनिधी) :

शेतकऱ्याने घाम गाळून पिके उभी करायची आणि बाजारात त्याच शेतकऱ्याच्या गरजेवर काही खत विक्रेत्यांनी आपली ‘वरकमाई’ची पिके फुलवायची, असा संतापजनक प्रकार पुर्णा शहरात सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. युरिया, डीएपीसारखी अत्यावश्यक खते चढ्या भावाने विकली जात असल्याचा आरोप असून, ‘लिंकिंग’च्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक आणि बिलाव्यतिरिक्त १०० ते १५० रुपयांची कथित वसुली होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्यांना रोखण्यासाठी असलेला कृषी विभाग मात्र नेमका कुठे आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.

       पुर्णेच्या बाजारात शासनाने निश्चित केलेल्या दराने खत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र या हक्कालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. २६६ रुपये छापील किंमत असलेली युरियाची बॅग ३०० ते ३५० रुपयांना, तर १ हजार ३५० रुपयांची डीएपीची बॅग १ हजार ५०० रुपयांना विकली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याने खत घ्यायचे की विक्रेत्याच्या ‘मनमानी दराला’ सलाम ठोकायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘लिंकिंग’च्या नावाखाली शेतकऱ्यांची कोंडी

खत हवे असेल तर त्यासोबत दुसरे उत्पादन घ्या, अशी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीही आहेत. त्यातच छापील किंमतीची पावती हातात देऊन त्यापेक्षा अधिक रक्कम आगाऊ घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खताची बॅग शेतकऱ्याला मिळते; मात्र त्यासोबत अतिरिक्त पैशांचा ‘बोजा’ही माथी मारला जातो.

        खत विक्रेत्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी तक्रारी करत असताना कृषी विभागाने आता ‘शहानिशा करून कारवाई करू’ असे सांगितले आहे. पण शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, शहानिशेच्या नावाखाली आणखी किती दिवस जाणार? खत विक्रीतील अनियमितता तपासण्या साठी असलेली यंत्रणा प्रत्यक्ष दुकानात जाऊन दर तपासणार की फक्त कागदावरच तपासणीचे सोपस्कार पार पाडणार शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून खत विक्रेत्यांना मोकळे रान मिळाले तर ‘कृषी विभाग कोणासाठी?’ हा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. शेतकऱ्यांच्या खिशातून अतिरिक्त पैसे काढणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का, याकडे आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

—————————–

‘आगाऊ रक्कम’ मागितली तर तक्रार करा!

पंचायत समितीच्या कृषी विभागाचे गुणनियंत्रण निरीक्षक गोविंद दहीवडे यांनी चढ्या भावाने खत विक्रीबाबत शहानिशा करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच खतासाठी आगाऊ रक्कम मागणाऱ्या दुकानदाराची तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

You cannot copy content of this page