परळी पालीकेच्या नागरी कामकाजासाठी आता व्हॉट्सॲप सुविधा !

Spread the love

व्हॉट्सॲप चॅटबॉट’चा निर्णय; नागरिकांना  घरबसल्या मिळणार  विविध सेवा व योजनांची माहितीसह डिजिटल सेवांचा लाभ

परळी वै,ता .१०| प्रतिनिधी(प्रकाश वर्मा)

नागरिकांना विविध सेवा व योजनांची माहिती घरबसल्या, जलदगतीने सहज उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परळी (वै) पालीकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्री धर्माधिकारी यांनी दिली आहे.

     परळी पालीकेच्या सभागृहात  नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा सुरू करणे ,अभ्यागतांच्या आवक-जावक नोंदीसाठी स्वतंत्र रजिस्टर,इमारत सुरक्षा, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नोंदवही, प्रवेश नियंत्रण व्यवस्था आणि अभ्यागत पास प्रणाली लागू करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या सुविधेमुळे नागरिकांना पालीकेच्या विविध सेवांची माहिती, अर्ज व प्रमाणपत्रांच्या प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कर व इतर नागरी सेवांबाबत मार्गदर्शन एकाच डिजिटल माध्यमातून मिळणार आहे. याशिवाय नागरिकांना तक्रार नोंदणी, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे, नगर परिषदेच्या महत्त्वाच्या सूचना तसेच आवश्यक संपर्काची माहिती ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे केवळ माहिती घेण्यासाठी नागरिकांचा वेळ खर्ची जाणार नाही.स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील विविध नागरी प्रश्न आणि विकासकामांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

     नागरिकांच्या सुविधा, सुरक्षितता आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना प्राधान्य देत विविध सकारात्मक निर्णय घेण्यात आले. डिजिटल नगर परिषद, सुरक्षित प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवा या संकल्पनेच्या दिशेने ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ चा निर्णय हा परळी नगर परिषदेचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांनी सांगितले.यावेळी रा.काॅ. गटनेते वैजनाथ सोळंके, भाजप गटनेते प्रा. पवन मुंडे, सौ. जयश्री गित्ते, सौ. अंजली माळी, सौ. कविता इंगळे, योगेश मेनकुदळे, कार्यलयीन अधीक्षक संतोष रोडे, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे, सभा व्यवस्थापन विभाग प्रमुख सत्यजित पिटके, बांधकाम विभाग प्रमुख आशिष दीक्षीत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page