Parbhaniगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची एसपींकडून पाहणी बुलेटवर बसून शहर दौरा;खड्डे, लोंबकणा-या तारांबाबत सूचना
पुर्णा ता.३ (प्रतिनिधी) परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी बुधवारी (ता.३) रोजी पुर्णा शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह विविध विसर्जन स्थळांची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी (डिवायएसपी) डॉ. समाधान पाटील यांना पाठीशी बसवून शहरातील मिरवणूक मार्गावर बुलेट रायड करत प्रत्यक्ष पाहणी केली.
पुर्णा शहरात दाखल झाल्यानंतर अधीक्षक परदेशी यांनी प्रथम महादेव मंदिर परिसर, श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान, दत्तमंदिर, जाहगीरदार कार्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरून मिरवणूक मार्गाची पाहणी केली. त्यानंतर गवळी गल्ली व महाविनगर परिसरातील विसर्जन स्थळांवरील विहिरींचीही पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी नगरपालिका तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, विद्युत तारांचा अडथळा दूर करणे, विसर्जन विहिरींना सुरक्षेसाठी लोखंडी कठडे उभारणे, प्रकाशयोजनेची योग्य व्यवस्था करणे आदी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
या पाहणी दरम्यान पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार श्रीनिवास पडलवार, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक मुमतेजीत खान, स्वच्छता निरीक्षक पारवे, विद्युत विभागाचे सलीम भाई, महावितरणचे शहर अभियंता वसमतकर व झेटे, जमादार बंडु राठोड, पोहेकाॅ. पवन लांडगेवाड आदी अधिकारी उपस्थित होते.गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन तसेच पालिकेकडून आवश्यक तयारी सुरू असल्याचे अधीक्षक परदेशी यांनी यावेळी सांगितले.











