परळी-बीड महामार्गावर भीषण अपघात;सरपंच व नातीचा जागीच मृत्यू..!

Spread the love

पत्नी गंभीर जखमी पांगरी गावाजवळ टिपर-बुलेटची जोरदार धडक; परिसरात हळहळ

परळी ता.१० (प्रतिनिधी) Beed-Parli Accident News बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पांगरी गावाजवळील परळी-बीड महामार्गावर बुधवारी (ता.१०) रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. यश कंपनीच्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत जळगव्हाण गावाचे सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) आणि त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सरपंचांची पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परळी तालुक्यातील जळगव्हाण गावाचे सरपंच वसंत चव्हाण हे बुधवारी कुटुंबीयांसह रुग्णालयातुन घरी परत येत असताना हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.हा अपघात जुन्या पांगरी गावातील नागरगोजे यांच्या आखाड्यासमोर घडला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात हलविले. परंतु सरपंच चव्हाण व नात श्रुती यांना वाचवता आले नाही.स्थानिकांच्या माहितीनुसार, बुलेटवरून प्रवास करत असताना टिप्परने समोरून येत धडक दिल्याने हा अपघात झाला.अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेनंतर टिप्पर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. सरपंच वसंत चव्हाण हे समाजकार्यात अग्रेसर होते. त्यांच्या अचानक मृत्यूने जळगव्हाणसह पांगरी परिसर शोकसागरात बुडाला आहे. अपघातग्रस्तांच्या घरासमोर हळहळ व्यक्त करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

You cannot copy content of this page