हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा शेतकरी कष्टकरींच्या राष्ट्रीय एकतेचा लढा- सुभाष ढगे
स्वा.सै. सुर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ वर्धापन दिना’ निमित्त व्याख्यान
पूर्णा ता.१५ (प्रतिनिधी)
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हा केवळ राजकीय नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, महिला–पुरुष आणि युवकांनी दिलेल्या त्यागातून उभा राहिलेला जनआंदोलन होता. या तीन भाषिक प्रदेशांतील (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा) जनतेच्या राष्ट्रीय भावनेमुळेच मराठवाड्यास खरी स्वातंत्र्यप्राप्ती झाली, असे प्रतिपादन व्याख्याते सुभाष ढगे यांनी केले.
स्वा.सै. सुर्यभान पवार महाविद्यालय, पूर्णा येथे ‘हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ वर्धापन दिना’ निमित्त “हैद्राबाद मुक्तिसंग्राम समजून घेताना” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ढगे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.पुढे बोलताना ढगे म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी, तसेच सरदार वल्लभ भाई पटेल, पं.जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेने एकत्रित पणे लढा दिल्यामुळेच हैद्राबाद राज्याची मुक्तता शक्य झाली.प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी मुक्तिसंग्रामातील ऐतिहासिक संदर्भ मांडले. त्यांनी ‘सशक्त शेतकरी लढा’ व कम्युनिस्ट विचारधारेच्या शेतकरी–कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. संतोष कुर्हे होते. मंचावर प्राचार्य डॉ. के. राजकुमार, सिनेट सदस्य इंजी. नारायण चौधरी, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. विजय भोपाळे, डॉ.भीमराव मानकरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवरून करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.शारदा बंडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी तर आभार प्रा. डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी मानले.या व्याख्यानमालेस प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












