निर्मनुष्य झालेल्या रेल्वे वसाहतीतील मतदारांचा मुद्दा ऐरणीवर..!

Spread the love

पुर्णा तहसीलदारांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी; अन्यथा जनआंदोलन

पूर्णा ता.१८(प्रतिनिधी) : पूर्णा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या फत्तरचाळीतील अस्तित्वात नसलेल्या मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पूर्णा शहरातील नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक ९ मध्ये समाविष्ट असलेल्या, मागील १५ वर्षांपासून निर्मनुष्य पडलेल्या रेल्वे वसाहतींमध्ये शेकडो मतदारांची नावे अद्याप मतदारयादीत कायम असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राजु नारायणकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पूर्णा तालुका निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कडे तक्रार नोंदवली आहे.

पूर्णा नगरपरिषदेच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे वस्तीमध्ये आज घडीला कुणीही प्रत्यक्ष वास्तव्यास नसतानाही, मतदार यादीत आजही सुमारे ८०० ते ९०० मतदारांची नावे कायम दाखवण्यात आली आहेत. तहसील प्रशासन व निवडणूक विभागाने केवळ बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्या अहवालावर विश्वास न ठेवता, स्वतः प्रत्यक्ष त्या परिसरात घराघर जाऊन डोर-टू-डोर पाहणी करत सदरील मतदार मयत आहेत का स्थलांतरित झाले याची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या सर्व मतदारांना बोगस समजून त्यांची नावे मतदारयादीतून तातडीने वगळण्यात यावीत, अशी ठाम भूमिका नारायणकर यांनी प्रशासनाकडे मांडली आहे.यावेळी प्रशासनाने जर वेळेत दखल घेतली नाही, तर या प्रकरणी जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

———————————————-

🔹 संपूर्ण प्रभाग क्रमांक ९ मध्ये बोगस मतदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा निवडणुकीची शुचिता धोक्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राज नारायणकर यांनी दिला.

You cannot copy content of this page