कर्जबाजारीपणा व आरक्षणाच्या विवंचनेत दोन युवकांचे आत्महत्येचे धक्कादायक प्रकार

Spread the love

मानवत व जिंतूर तालुक्यातील घटना; शेतकरी आणि तरुणाने जीवनयात्रा संपवली

परभणी ता.१८(प्रतिनिधी)
जिल्ह्यात सलग दोन दिवसांत कर्जबाजारीपणा आणि आरक्षणाच्या अनिश्चिततेतून नैराश्यग्रस्त होऊन दोन वेगवेगळ्या युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मानवत तालुक्यातील मानोली येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली, तर जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथील एका तरुणाने घरात गळफास घेतला. या घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मानोलीतील शेतकऱ्याची आत्महत्या

मंगळवारी (दि.१६) सकाळी मानोली (ता. मानवत) येथे गोविंद काळूराम मुळक (वय ३५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाच्या विवंचनेत विषारी द्रव प्राशन केले. वडिलांच्या नावे असलेल्या शेतीवर घेतलेले तब्बल पाच लाख रुपयांचे बँक कर्ज कसे फेडावे या टेन्शनमुळे तो नैराश्यात गेला होता. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सेलू पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

मारवाडीतील तरुणाची आत्महत्या

सोमवारी (दि.१५) दुपारी जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथे विजय विलासराव देशमुख (वय २५) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज व मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार की नाही या दडपणामुळे तो मानसिक नैराश्यात गेला होता. या कारणास्तव विजयने जीवनयात्रा संपवली. या घटनेची नोंद बोरी पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून झाली आहे.


You cannot copy content of this page