Parbhani;पालकमंत्री बोर्डीकर व आमदार विटेकर यांनी केली नुकसानीची पाहणी

Spread the love

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान;पंचनाम्याचे आदेश

परभणी ता.१८ (प्रतिनिधी)जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजाच्या संकटाची जाणीव ठेवत बुधवारी (दि.१७) पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे व पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी विविध गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली.

पालकमंत्री बोर्डीकरांची बांधावर जाऊन पाहणी

पालकमंत्री बोर्डीकर यांनी मानवत तालुक्यातील वाडी दमई येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या पिकांची पाहणी करून त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश दिले.
“शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, काळजी करू नका,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

आमदार राजेश विटेकरांचा दौरा..

दरम्यान, आमदार राजेश विटेकर यांनी पाथरी व सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव, मोहळा, लोणी, कानसुर, उमरा, गुंज, गौंडगाव आदी गावांचा दौरा केला.या भागात गेल्या दोन-चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. नद्या व ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
आमदार विटेकर यांनी महसूल विभागास नुकसानग्रस्त जमिनींचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सरपंच व शेतकरी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून तात्काळ मदत व योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


You cannot copy content of this page