सिंदफणा कोपली.! नदीचा रुद्रावतार,आष्टी, पाटोदा,शिरूर,पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकांचे नुकसान शेतकरी हतबल
आष्टी ता.२१/ प्रतिनिधी :जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वरुणराजाचा प्रकोप पाहायला मिळाला. आष्टी, पाटोदा, शिरूर व पाथर्डी तालुक्यात रविवारी (दि. २१) रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफणानदीने सोमवारी रुद्रावतार धारण केला. गेल्या अनेक दशकानंतर नदीला असा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अतिवृष्टीमुळे सिंदफणानदीसह किना, उथळा, कापरी आदी उपनद्याही उफाळून वाहू लागल्या. परिणामी हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन कापूस, उडीद, सोयाबीन, बाजरी, ऊस यासारखी हंगामी पिके जमीनदोस्त झाली. शेतात राब राबून उभी केलेली पिके काही क्षणात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.
📌 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आधीच उभ्या पिकांची स्थिती बिकट झाली होती. कापसाची बोंडे सडू लागली होती. त्यातच रविवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सिंदफणाने हद्द सोडून तब्बल एक किलोमीटर रुंद प्रवाह घेतला. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतकरी राजाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
📌 मृत महिलेची ओळख पटली
पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. रामकंवर कचरू जगताप (वय ४५, रा. शिराळ, ता. आष्टी) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून त्या निराधार व भिक्षेकरी होत्या. सांगवी (आष्टी) येथे रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थ व गोताखोरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
📌 गावांचा संपर्क तुटला
नदीवरील पुलांवर १५ ते २० फुट पाणी वाहत असल्याने दक्षिण-उत्तर तीरावरील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. यामुळे वाहतूक, दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून अनेक गावं विलग झाली आहेत.
📌 वीज व मोबाईल सेवा ठप्प
पूरस्थितीमुळे विद्युत वितरण कंपनीने सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे मोबाईल टॉवर बंद पडले असून फोन सेवा व इंटरनेट कनेक्शन दिवसभर ठप्प राहिले. नागरिक त्रस्त होऊन नेटवर्कच्या प्रतीक्षेत मोबाईलकडे पाहत राहिले.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ धाव घेत आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सिंदफणानदीचा हा रुद्रावतार शेतकऱ्यांच्या घामाने बहरलेल्या पिकांना उद्ध्वस्त करून गारद करून गेला आहे.












