Laxman Hake News;ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे विश्वासू सहकारी पवन कंवरवर प्राणघातक हल्ला

नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवल्यानंतर पुन्हा एकदा हाकेंचे दुसरे सहकारी हल्लेखोरांच्या टार्गेटवर..?परभणी जिल्ह्यातील केरवाडी (ता. पालम) येथील रहिवासी पवन कंवर
बीड, दि. २४ (प्रतिनिधी) :
ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी पवन कंवर यांच्यावर मंगळवारी (२३ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास सावरगांव जवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला. ३५ ते ४० हल्लेखोरांनी लाठ्या, काठ्या व लाथा- बुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत पवन कंवर गंभीर जखमी झाले असून सध्या माजलगांवमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जेवायला बसले आणि हल्लेखोर तुटून पडले
परभणी जिल्ह्यातील केरवाडी (ता. पालम) येथील रहिवासी असलेले पवन कंवर मंगळवारी रात्री आपल्या दोन साथीदारांसह सावरगावजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. मात्र, अचानक ३५-४० जणांचा जमाव ढाब्यावर धडकला आणि त्यांनी तिघांवर बेछूट हल्ला चढवला. काही क्षणांतच ढाब्यावर भीषण दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
डोक्याला व पायाला गंभीर दुखापत
या हल्ल्यात पवन कंवर यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबतचे अन्य दोघेही जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले असून, पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
आंदोलकांच्या कार पेटविण्याच्या घटनेनंतर प्राणघातक हल्ला
अलीकडेच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार पेटवून देण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पवन कंवरवरील प्राणघातक हल्ल्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे. पवन कंवर हे हाके यांच्या प्रत्येक आंदोलन व सभेदरम्यान उपस्थित असत. त्यामुळे या घटनेमुळे ओबीसी आंदोलनाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
⚡ लक्ष्मण हाके आक्रमक : कठोर कारवाईची मागणी
(Laxman Hake met with Superintendent of Police of beed)घटनेची माहिती मिळताच लक्ष्मण हाके यांनी बुधवारी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “हल्लेखोरांना दोन दिवसांत अटक झाली नाही, तर आम्ही( Beed SP)पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू,” असा इशारा हाके यांनी दिला.हाके यांच्या इशाऱ्यानंतर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.पवन कंवरवरील या प्राणघातक हल्ल्यामुळे बीड-परभणी जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली असून, हाके समर्थकांत प्रचंड संताप उसळला आहे.












