Dhangar Reservation! जालन्यात धनगर समाजाचा महामोर्चा.!
फडणवीस- मोदींवर टीका, आंदोलनाची पुढील दिशा जाहीर

जालना ता.२४(प्रतिनिधी)Dhangar Reservation News अनुसूचित जमातींमध्ये समावेशाच्या मागणीसाठी धनगर समाजाने बुधवारी (ता.२४) जालना शहरात भव्य मोर्चा काढला. गांधी चौकातून निघालेला मोर्चा उपोषणस्थळी पोहोचून सभेत परिवर्तित झाला. मोर्चाच्या व्यासपीठावर ‘फडणवीस आणि भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनाची आठवण’ करून देणारे फलक लावण्यात आले होते.उपोषणकर्ते दीपक बोहाडे यांचा हा सलग आठवा दिवस होता. सभेत बोहाडे यांनीच भाषण करताना भाजप सरकारवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “२०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी घोंगडी खांद्यावर घेऊन, ढोल वाजवून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांनीही सत्तेत आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. मात्र आजवर फसवणूकच झाली. सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घ्यावे लागेल.”ते पुढे म्हणाले, “आरक्षणाबाबत खोटे बोललो असेल तर माफी मागावी. फसवणूक झाली तर तोंड काळे करून दाखवू.” यावेळी सभेत देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले फलकही लावण्यात आले.आपले उपोषण सुरूच राहील आणि १ ऑक्टोबरनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा बोहाडे यांनी यावेळी दिला.यावेळी परभणी, नांदेड, हिंगोली, लातुर, संभाजीनगर, धाराशिव सह राज्यभरातील लाखो धनगर समाज बांधवांनी या महामोर्चाला उपस्थीती लावली.परभणी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाचा पुढील कार्यक्रम
- २६ सप्टेंबर : सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर धरणे व निवेदन सादर
- २९ सप्टेंबर : भाजप खासदार-आमदारांच्या निवासस्थानांसमोर मेंढरे घेऊन व ढोल वाजवून धरणे
- १ ऑक्टोबर : राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

सभेत आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, भूषणसिंह राजे होळकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र बोहाडे यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही भाषण केले नाही.दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात आलेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपोषणस्थळी बोहाडे यांची भेट घेतली. ते म्हणाले, “धनगर समाजाचा आवाज मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवीन. समाजाच्या मागणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीन.” हा मोर्चा आणि बोहाडे यांचे उपोषण लक्षवेधी ठरत असून, पुढील काही दिवसांत आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












