“महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देऊ”-मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
मंत्री मकरंद पाटील यांच्या कडून गुरुवारी पुर्णा तालुक्यातील धानोरा, ताडकळस व गंगाखेड येथील धारासुर येथे पाहणी दौरा

पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी) जोरदार अतिवृष्टीच्या “या पावसाने होत्याचं नव्हतं झालंय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसह जनावरांचे चारापाणी, घरे, संसारोपयोगी साधनसामग्री वाहून गेली आहे. लेकरांच्या भविष्यापासून संसाराच्या आधारापर्यंत सर्व काही वाहून गेलंय. पण घाबरून जाऊ नका. सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईच्या स्वरूपात मदत देऊन तुमची दिवाळी गोड करण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे.” राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आश्वस्थ केले आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे धानोरा काळे, ताडकळस व गंगाखेड तालुक्यातील धारासुर या सर्कल मधील अतिवृष्टीग्रस्त भागांना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी गुरुवारी (ता.२५) रोजी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दिलासा दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की, “शेतकरी बांधव काळ्या मातीत जगतो, मातीसाठी मरतो; पण आज तो न्याय आणि आधार मागतोय. हे केवळ तुमचे एकट्याचे संकट नसून संपूर्ण राज्याचे संकट आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या बांधावर आलो आहोत आणि सरकार निश्चितच शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठोस पावले उचलेल.” त्याबाबत आपण चिंता करू नये सरकार लवकरच मदत देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.या दौऱ्यात आमदार राजेश विटेकर, आमदार डॉ रत्नाकर गुट्टे,माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह प्रशासनातील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथिकर ,अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.












