लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के आणि गूढ आवाज

Spread the love

३० सप्टेंबरच्या रोजी झालेल्या विनाशकारी भुकंपाचीच्या आठवणी जाग्या;प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

लातूर ता.३०(प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा, रेणापूर आणि लातूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सौम्य भूकंपाचे धक्के आणि गूढ आवाज जाणवत असल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली आहे.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार,२३ सप्टेंबर रोजी सकाळी ८:१३ वाजता मुरुड अकोला येथे २.३ रिश्टर स्केल,२४ सप्टेंबर रोजी हासोरी परिसरात २.४ रिश्टर स्केल,२६ सप्टेंबर रोजी बोरवटी परिसरात २.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले आहेत.याशिवाय बोरवटी, दगडवाडी, सालगरा, हासोरी, बदूर, उस्तुरी, काळंदी, औसा शहर, शिरूर-अनंतपाळ, राणी अंकुलगा, घुगीसगावी, कुंभारवाडी या भागांत गूढ आवाज आणि हलके कंपन जाणवल्याची माहितीही मिळाली आहे.

जिल्हा प्रशासनाने या घटनांचा अहवाल तयार करून राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, भारतीय हवामान विभाग, भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था आणि नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांना पाठवला आहे. तज्ज्ञांकडून तपासणी करून मार्गदर्शन मिळावे, तसेच उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणीही केली आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, कोणतीही घटना आढळल्यास नजीकच्या तहसीलदारांना तात्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर यांच्याकडून करण्यात आले आहे.


You cannot copy content of this page