महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका;पुर्णेतील कळगांवात शॉर्टसर्किट मुळे १४ एकर ऊस जळाला,३० लाखांचे नुकसान..!
पूर्णा ता.५ (प्रतिनिधी)
तालुक्यातील अजदापूर येथे काही दिवसांपूर्वी तार तुटून साडेचार एकर ऊस जळाल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रविवारी (ता.५ ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजता कळगाव शिवारात शॉर्टसर्किट होऊन ७ शेतकऱ्यांच्या १४ एकर जमिनीवरील ऊस जळून खाक झाला. या आगीत तब्बल २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले आहे.ग्रामस्थांच्या वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणखी मोठी हानी टळली असून जवळपास ४० ते ५० एकर ऊस वाचवण्यात यश आले. मात्र, ज्यांचा ऊस जळून गेला त्या शेतकऱ्यांची मात्र कोट्यवधींची स्वप्ने राख झाली आहेत.
आग कशी लागली?
कळगाव येथील सुभाषराव निवृत्ती सुर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी व त्यांच्या कुटुंबीयांची गट क्रमांक १५, १६, १९, २०, २५, २६ या क्षेत्रात जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी गेल्या वर्षी ऊस लागवड केली होती. हा ऊस गाळपासाठी काही दिवसांत कारखान्यात जाणार होता. या शेतातून महावितरणची वीजवाहिनी गेली आहे.मागील चार वर्षांपासून या धोकादायक विद्युत वाहिन्यांबाबत सुर्यवंशी कुटुंबीयांनी वारंवार निवेदन देऊन महावितरणला सूचना केली होती. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रविवारी दुपारी शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला आणि १४ एकरवरील उभा ऊस जळून खाक झाला.
ग्रामस्थांचा धाडसी प्रयत्न..
आगीची तीव्रता एवढी होती की काही मिनिटांतच १४ एकरवरील ऊस जळून गेला. गावातील नागरिकांनी लगेच धाव घेतली. त्याचवेळी कळगाव सज्जाचे तलाठी शिरसेवाड हे शेतात पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यांनीही ग्रामस्थांना मदतीला घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वांच्या अथक प्रयत्नांतून शेजारील शेतकऱ्यांचा ४० ते ५० एकर ऊस वाचवण्यात आला.
प्रशासन मदतीला धावले नाही..!
आग लागल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी महसूल प्रशासन, कृषी विभाग, अग्निशमन दल आणि पोलिसांना तातडीने कळवले. परंतु वेळेत मदत न मिळाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. जर योग्य वेळी यंत्रणा पोचली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पोलिसांत नोंद..
या घटनेची नोंद प्रसाद सुभाष सुर्यवंशी यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, या आगीत शेतकऱ्यांचे तब्बल २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.












