शेतातील पाण्यावरून वाद उसळला-ऊस तोडणीच्या कोयत्याने एकावर जिवघेणा हल्ला.!
पुर्णा ता.९ (प्रतिनिधी): पाण्याच्या वाहण्याच्या किरकोळ कारणावरून सुरु झालेला वाद रक्तरंजित संघर्षात परिवर्तित झाला. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार कोयत्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने धनगर टाकळी परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली असून, चुडावा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन साखरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून, विश्वनाथ साखरे (रा. धनगर टाकळी) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेतातील पाणी फिर्यादीच्या शेतात येत असल्याने गजानन यांनी विश्वनाथला “तुझ्या शेतातील पाणी आमच्या शेतात येऊ देऊ नको” अशी तंबी दिली होती. यावरून विश्वनाथ रागावला आणि “तु शेतात मला जास्त बोललास, आता तुला दाखवतोच” असे म्हणत त्याने हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने गजानन साखरे यांच्यावर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात गजानन यांच्या डोक्यात, मानेवर व हातावर गंभीर जखमा झाल्या असून, घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर आरोपीने धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला. जखमी गजानन यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद चुडावा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक मुखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.












