लोहमार्ग पोलीसच निघाला चोरट्यांचा साथीदार.!

Spread the love

कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसमधील १४ लाखांच्या चोरीचा सनसनाटी उलगडा चोरट्यासह पोलीस कर्मचारीही अटकेत

पूर्णा ता.११ (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला लोहमार्ग पोलीस कर्मचारीच चोरट्यांचा साथीदार निघाल्याने रेल्वे पोलिसांत खळबळ उडाली आहे. कोल्हापूर–नागपूर एक्सप्रेसमधील तब्बल १४ लाख १ हजार २०० रुपयांच्या चोरीप्रकरणाचा तपास करताना ही धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी चोरट्यासह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यालाही अटक केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,गणेश कांतीलाल राठी हे (ता. ७) ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसने प्रवास करत असताना परभणी-पूर्णा दरम्यान त्यांच्या बॅगमधील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम मिळून एकूण १४ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. पूर्णा स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर चोरी उघडकीस आली होती.या घटनेचा तपास नागपूर रेल्वे लोहमार्ग गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि त्यावरून संशयित बाळूराम गणपत गव्हाणे (वय ४०, रा. तरोडा, जि. नांदेड) याला अटक करण्यात आली. मात्र, तपास पुढे सरकत असताना या चोरट्याला माहिती आणि साथ देणारा एक लोहमार्ग पोलीस कर्मचारीच या कटात सामील असल्याचे समोर आले!

त्या पोलिस कर्मचाऱ्याची ओळख अक्षय जितेंद्र मोरतुले अशी असून, त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या संगनमतातून चोरीचा संपूर्ण कट रचल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या दोघांकडून मिळून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या सनसनाटी प्रकरणाचा तपास रेल्वे अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय लोहकरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव जोगदंड करीत आहेत. गुन्हा भा.दं.वि. कलम ३८०, ४०९, १२०(ब) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

या तपासात संजय भेंडेकर, साखला, राहुल गायकवाड, धाडवे, सिलकेवाड, प्रमोद जाधव तसेच ड्रायव्हर खंडागळे यांनी मोलाची भूमिका बजावली.लोहमार्ग पोलिसाच्या सहभागामुळे विभागात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या प्रकरणामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “रक्षकच भक्षक ठरल्याची” चर्चा सर्वत्र रंगली आहे.

You cannot copy content of this page