आरक्षणाच्या राजकारणाने पुन्हा एक जीव घेतला…!

Spread the love

शिरुर तालुक्यातील पाडळी गावातील घटना;ओबीसी आरक्षण धोक्यात येईल “मुलांचं भवितव्य हरवेल” या भीतीने शिरूर तालुक्यातील वृद्धाची आत्महत्या

शिरूर ता.१३(प्रतिनिधी)ओबीसी आरक्षणावर मराठा समाजाच्या दाव्यामुळे आपला समाज मागे पडेल, आपल्या लेकरांचं भविष्य धोक्यात येईल — या खोल चिंतेतून शिरूर तालुक्यातील पाडळी गावातील एका वृद्ध पित्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.बबन तुळशीराम दुधाळ (वय ६०) असे या हृदयद्रावक घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा कृष्णा बबन दुधाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बबन दुधाळ हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड अस्वस्थ होते. “मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी प्रवर्गात आरक्षण दिल्यास, आमच्या मुलांसारख्या ओबीसी तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल,” अशी व्यथा ते नेहमी कुटुंबियांसमोर मांडत असत. त्यांच्या बोलण्यात वाढत चाललेलं नैराश्य आणि असहायता अखेर प्राणघातक ठरली.त्यांचा मोठा मुलगा सावता कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तर धाकटा मुलगा कृष्णा तागडगाव येथील महाविद्यालयात बी.ए.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. “मुलांचे भविष्य अंधारात जाईल,” हीच काळजी अखेर वडिलांसाठी जीवघेणी ठरली.

पाडळी गावात या घटनेनंतर शोककळा पसरली आहे. गावकरी, नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसंगी ओबीसी समाजाच्या भावना समजून घेण्याची मागणी केली आहे.आरक्षणाच्या राजकारणाने पेटलेली ही आग, एका संवेदनशील बापाचे जीवन घेऊन गेली — हे वास्तव अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेलं आहे.

You cannot copy content of this page