१७ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात आढळला..
ममदापूर शिवारातील घटना;मयत पिंपरी देशमुख येथिल रहीवाशी; अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सोडलं होतं घर
पूर्णा, दि. १८ (प्रतिनिधी) पूर्णा तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील शेतकरी भगवान विठलराव माने (वय ४२, व्यवसाय शेती) हे गेल्या १७ दिवसांपासून बेपत्ता होते. आज अखेर त्यांचा मृतदेह पूर्णा नदीच्या पात्रात झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे आणि सततच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीने निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पोलीसांना दिली आहे.
या प्रकरणी मयताचे भाऊ बाळासाहेब विठलराव माने (वय ४०, व्यवसाय शेती, रा. पिंपरी देशमुख ता. पूर्णा) यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “मी व माझे दोन भाऊ व दोन बहिणी मिळून कुटुंबासह पिंपरी देशमुख येथे राहतो. माझा भाऊ भगवान विठलराव माने यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. परंतु सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते नेहमीच चिंतेत असत.”“दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून माझा भाऊ घरून निघून गेले आणि परत आले नाहीत. शोध घेतल्यानंतर दि. १ ऑक्टोबर रोजी ताडकळस पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार (क्र. १२/२०२५) दाखल केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पिंपरी देशमुख शिवारातील पूर्णा नदीपात्रात एक प्रेत वाहत असल्याची माहिती मच्छिमारांनी दिली होती, परंतु त्यावेळी ओळख पटली नव्हती.”
दरम्यान, (दि. १७ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता गावचे पोलीस पाटील प्रकाश कहाते यांनी माहिती दिली की, “ममदापुर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात एका झाडाला एक प्रेत अडकले आहे.” ही माहिती मिळताच बाळासाहेब माने, गजानन माने, दत्तराव माने, अंबादास चिमटे तसेच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाटील विनंता काळबांडे (ममदापुर) यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला असता तो भगवान माने यांचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले.भगवान माने यांनी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा ताण व पिकांच्या नुकसानीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून पूर्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली अशी तक्रार पुर्णा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना स्वाधीन केला आहे.पुढील तपास जमादार रमेश मुजमुले हे करत आहेत.मयत भगवान माने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ व बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे पिंपरी देशमुख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












