समता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश – हभप ज्ञानेश्वर महाराज बावळे
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुर्णेत किर्तन सोहळा संपन्न
पूर्णा, ता. २० (प्रतिनिधी): “संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी कर्मकांड व खोटेपणाला थारा न देता माणुसकीची शिकवण दिली. तुकोबारायांनी ‘देव माणसातच आहे’ हे सांगितले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या तत्त्वांना भारतीय संविधानाचा गाभा बनवले,” असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर महाराज बावळे यांनी केले.

माणुसकी फाउंडेशनच्या वतीने मास्टर अनिल कांबळे यांच्या पुढाकाराने शनिवारी (ता. १८) पुर्णा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील एकता, समता आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, श्री गुरु बुद्धिस्वामी मठ संस्थानचे मठाधिपती डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामी, भंते पय्यावंश, भंते पय्यासार, हभप नितीन महाराज सावंत, रिपाई नेते प्रकाश कांबळे, नामदेवराव राजभोज, माजी नगराध्यक्ष संतोष एकलारे ,प्राचार्य मोहनराव मोरे, गटनेते उत्तमभैय्या खंदारे, पृथ्वीराज शिंदे, शंकरराव पुंडगे, सुभाषराव देसाई, नितीन कदम, अशोक धबाले, अय्युब कुरेशी, दादाराव पंडित, राजकुमार सूर्यवंशी, गजानन कदम, अनिल नरवाडे, ॲड. हिरानंद गायकवाड, सोनू काळे, मिलिंद कांबळे, सुनील कांबळे, डॉ. उज्ज्वला कांबळे, सोनू कांबळे, शाहीर विजय सातोरे, काशीबाई कांबळे, प्रा. डॉ. दयानंद कांबळे आदींसह विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
🟦 भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांचे मार्गदर्शन “पैसा, पद, सत्ता यांचा गर्व नको. निर्मळ मन, शुद्ध विचार आणि सहकार्यभाव या तीन गोष्टी यशाचे गमक आहेत. बुद्धांचा विचार सागरासारखा विशाल आहे — आपणही त्यासारखे व्यापक व्हावे, संकुचित विचार टाकून द्यावेत. बौद्ध धम्म हा मानवतेचा आणि माणुसकीचा धर्म आहे,” असे भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी मार्गदर्शन केले.
🟨 समाजरत्न पुरस्काराने गौरव या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानितांमध्ये प्रा. डॉ. पांडुरंग भूताळे, जगदीश जोगदंड, संघरत्न सोनसळे, सचिन कागदे, प्रा. एम. एम. सुरनर, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, नितीन सावंत, रमेश गायकवाड आणि सिद्धार्थ ढवळे यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मास्टर अनिल कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार सूर्यवंशी यांनी केले












