रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

Spread the love

पुर्णेतील चित्र; रेसुबल, स्थानिक व लोहमार्ग पोलिसांचा निष्क्रिय कारभार सुरक्षा वा-यावर!

पुर्णा, ता.२२ (प्रतिनिधी) येथिल रेल्वे स्थानक परिसर हे सध्या चोरटे, लुटारू आणि असामाजिक घटकांचे सुरक्षित अड्डे बनले आहेत. स्थानिक पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल (रेसुबल) यांच्या निष्क्रीयतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दिवसाढवळ्या दुचाकी चोरी, पाॅकेटमारी, चैनस्नॅचिंग आणि प्रवाशांना लुटण्याच्या घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत.

पुर्णा रेल्वे स्थानक परिसरात मागील काही दिवसांपासून ना स्थानिक पोलीस, ना लोहमार्ग पोलीस, ना रेसुबलचे कर्मचारी दिसत नसल्याने गुन्हेगारांना मुक्त संचार वाढल्याचे चित्र दिसत आहे. प्लॅटफॉर्म क्र. ४ बाहेरील रस्ता आणि मुख्य प्रवेशद्वार परिसरात हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण करून स्थायी बस्तान मांडले असून रात्री उशिरापर्यंत खानपान सुरू असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे सहजपणे प्रवाशांची पाकिटे, दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करतात.

‘दुचाकी चोरींच्या घटनात वाढ’

स्थानकपरिसरात सुरक्षा उपाय योजना नसल्याने प्रवाशांच्या दुचाक्या रोजच्या रोज चोरीस जात आहेत. मंगळवारी (ता.२२) रात्री माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी यांचे बंधू खालेद कुरेशी यांची दुचाकी स्टेशनसमोरील परिसरातून चोरट्यांनी पळवली. त्याच रात्री एका प्रवाशाचे पाॅकेट लंपास झाल्याची घटना देखील घडली.दुचाकीतील पेट्रोल संपल्याने चोरट्यांनी दुचाकी गुडमार्निग रस्त्यावर सोडून गेल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी सुदैवाने मिळाली.मात्र अश्या घटना वारंवार घडता कामा नये असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे.

रेल्वे स्थानक परिसर अवैध धंद्यांचा अड्डा

महावीरनगर परिसरातील बीट हद्दीत स्थानकाभोवती रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे परिसर गुन्हेगारीकडे झुकला असून महिला छेडछाड, प्रवाशी लुटमार, दुचाकी चोरी अशा घटना सतत वाढत आहेत. पोलिसांचा दरारा संपला असून नागरिकांमध्ये भीतीऐवजी संतापाचे निर्माण होत आहे.

रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस ‘नावालाच’; फक्त गणवेश, काम शून्य!

रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फक्त नावालाच कार्यरत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ना गस्त, ना चौकशी, नातपासणी.सिसीटीव्ही कॅमेरा शोभेच्या वस्तू परिणामी रेसुबलचे अस्तित्व केवळ बोर्डापुरते राहिले आहे. वारंवार घडणाऱ्या पाॅकेटमारी, हाणामारी आणि चोरीच्या घटनांमुळे नागरिकांचा संयम संपत चालला आहे.

प्रवाशांची मागणी- “आता तरी जबाबदारी ठरवा!”

प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की, संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त गस्त सुरू करावी, अतिक्रमण हटवावे, आणि दुचाकी पार्किंगसाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी. अन्यथा प्रवाशी वर्ग आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, असा इशाराही देण्यात आला आहे.“रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांनी ‘सुरक्षा’ हा शब्द केवळ बोर्डावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत दाखवावा-अन्यथा जनता पोलिसांवरचा विश्वास गमावेल.!”

You cannot copy content of this page