पाण्याच्या टाकी बांधकामासाठी विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा

पुर्णा शहरातील प्रकार; स्थानिक महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष ;कंत्राटदारावर काय कारवाई होणार याकडे लक्ष
पुर्णा ता.२९(प्रतिनिधी)
शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने थेट वीजवाहिनीवर अकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे महावितरण कंपनीची लाखों रुपयांची विज चोरी गेल्याने आता महावितरणच्या वतीने संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई होणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

पुर्णा नगरपरिषदेने शहरासाठी जवळपास ८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत शहरात चार ठिकाणी मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. तेथे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांसाठी (व्हायब्रेटर, मिक्सर, ड्रिल मशीन) इत्यांदीसाठी वीज चोरी करून वापरली जात असल्याचे उघडकीस आले आहे.गत दीड महिन्यांपासून ही वीज चोरी सुरू असून,महावितरणच्या अधिकार्यांना याची माहिती मिळाल्या नंतर काही कर्मचारी घटनास्थळी गेले. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
नागरिकांचा सवाल आहे की, सामान्य माणूस वीज चोरी केली तर तात्काळ गुन्हा दाखल केला जातो, पण नगरपरिषदेच्या कंत्राटदारावर मात्र महावितरणने मौन का बाळगले आहे?संबंधित कंत्राटदार हा एका प्रभावी लोकप्रतिनिधीचा जवळचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच अधिकारी गप्प बसले आहेत का, अशी चर्चा शहरात सुरू आहे.काम करणारा कंत्राटदार स्वतः सह एकापाठोपाठ एक गोड चुका करत आहे.त्यामुळे पालीकेची नाहक बदनामी होत आहे.त्यामुळे पालीकेची या प्रकरणी काय भुमिका असणार याकडे लक्ष लागले आहे.
पाणीपुरवठा योजना तडीस जाईल का.?
पालीकेने शहरासाठी ८० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे.यासाठी नियुक्ती केलेल्या कंत्राट कंपनीच्या वतीने बेसुमार चुका होत आहेत.त्यामुळे ही योजना योग्य प्रकारे तडीस जाईल का यावर शंका उपस्थित होत आहे.
कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे चिमुकल्याचा यापुर्वी गेला होता जीव
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे काही महिन्यांपूर्वी हरिनगर भागात पाण्याच्या टाकीच्या खड्ड्यात पडून एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता विज चोरीचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. महावितरण कंपनीने या प्रकरणात तातडीने कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.












