मॉन्टोकार्लो कंपनीने पूर्णा नदीत उभारला बेकायदेशीर पूल!
अनाधिकृत पुल उभारणी मुळे कंपनीला एसडीओंची नोटीस; कारवाईचे संकेत
पुर्णा ता.८(प्रतिनिधी)मौजे उखळद येथील गट क्रमांक ४९ मधून उत्खनन केलेल्या मातीच्या वाहतुकीसाठी मेसर्स मॉन्टोकार्लो लिमिटेड कंपनीने पूर्णा नदीत विनापरवानगी तात्पुरता पूल उभारल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मंडळ अधिकारी पिंगळी व ग्राम महसूल अधिकारी उखळद यांच्या संयुक्त स्थळपरीक्षणात ही बाब स्पष्ट झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी कंपनीला थेट BNSS कलम १५२ अन्वये नोटीस बजावत कडक भूमिका घेतली आहे.
स्थळपहाणीनुसार नदीपात्रात तब्बल १५ सिमेंटच्या नळ्यांवर २० फूट रुंद आणि १० फूट उंच भराव घालून मोठ्या आकाराचा तात्पुरता पूल बांधण्यात आला. या पुलावरून उखळद ते नांदगाव खुर्ददरम्यान समृद्धी महामार्गासाठी लागणारे गौण खनिज व साहित्य वाहतूक केली जात असल्याचेही निष्पन्न झाले. सार्वजनिक वापरातील नदीच्या प्रवाहात अशा प्रकारे अडथळा निर्माण करणे हे सार्वजनिक उपद्रव ठरणारे कृत्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नदीप्रवाहात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यासाठी जलसंपदा किंवा पाटबंधारे विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक असते; मात्र मॉन्टोकार्लो कंपनीकडे अशी कोणतीही परवानगी नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. यामुळे पूरस्थिती, गाळ साचणे आणि पर्यावरणीय हानीचा धोका निर्माण होऊ शकतो, असे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
एसडीओ भोसले यांनी कंपनीला दोन दिवसांत या कृत्याची वैधता स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून परवानगी नसल्यास अडथळा तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा BNSS कलम १५२ सह संबंधित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, मोठ्या कंपन्यांकडून नियमांची उघड उघड पायमल्ली होत असल्याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











