Ramdas Athawale; यांचा २५ फेब्रुवारीला परभणी दौरा

Spread the love

परभणी, दि. २४ (प्रतिनिधी) :

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत. दौऱ्यादरम्यान पूर्णा व परभणी येथे शासकीय तसेच पक्षीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे नियोजन आहे.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी ११ वाजता ते छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने पूर्णा येथे आगमन करणार आहेत. पूर्णा येथे दिवंगत यादवराव भवरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. या वेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.यानंतर दुपारी १२.४५ वाजता परभणी येथील शासकीय विश्रामगृह येथे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांबाबत सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

तसेच दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते केंद्र सरकारच्या योजनांबाबत माहिती देणार असून स्थानिक प्रश्नांवरही भाष्य करण्याची शक्यता आहे.दुपारी ३ वाजता ते परभणी येथून अहमदपूर, जि. लातूरकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व संबंधित विभागांनी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

You cannot copy content of this page