चारठाणा हद्दीतील चोरीचा स्था.गु.शाखेच्या पथकाने केला पर्दाफाश
• चोरी प्रकरणी दोघे जेरबंद;चारठाणा पोलीसांकडून अधिक तपास सुरू
परभणी,ता.२८/प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रूपयांचे दागिने चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपींकडून पथकाने चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चारठाणा पोलीस ठाण्यात परिसरात झालेल्या दागिने चोरी प्रकरणी गुरनं ४२/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (२), ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात लाखो रूपयांचे दागिने चोरी झाल्याचे नमुद करण्यात आल्याने पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी गुन्हा शाखेच्या पथकास तपासासाठी सुचना दिल्या होत्या. यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे विवेकानंद पाटील, जगताप, मुकेश बुधवंत, डुकरे, तुपसुंदर, चाटे, सातपुते, गणेश कौटकर, आव्हाड, डुबे, पौळ, चव्हाण, साने, हनवते आदींचे पथक चारठाणा परिसरात चौकशी करीत असतांना त्यांना चारठाणा पोलीस ठाण्याचे दळवे, झुजुडे, माने यांनी सहकार्य केले. दरम्यान पथकास दागिने चोरी प्रकरणातील आरोपीचा सुगावा लागला.
यावरून केलेल्या कारवाईत पथकाने आरोपी सांगिता भारत मुंजे आणि विष्णु ऊर्फ बाळु काशीनाथ चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून चोरीचे ९० हजारांचे चांदीचे दंडकडे, पाटली जोड, बाळी जोड, १४ हजारांचे चांदीचे चैनजोड, ४ हजार ५०० रूपयांचे चैन जोड, ६० हजारांचे सोन्याचे झुंबर आणि रोख १५ हजार असा एकूण १ लाख ८३ हजारांचे मुद्देमाल जप्त केला. प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी चारठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.











