पूर्णा पोलिसांनी १० दिवसांत लावला दोन जबरी चो-यांचा छडा
५ चोरटे अटकेत; ६ दुचाकी, ११ मोबाईलसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुर्णा ता.२०(प्रतिनिधी)
शहरात गेल्या आठवड्यात रेल्वे स्थानक व शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या दोन जबरी चोरींचा पूर्णा पोलिसांनी वेगवान तपास करत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा दुचाकी, ११ मोबाईल फोन असा सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १३ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास अलंकार नगर येथील व्यावसायिक मनोहर सोपान माघाडे यांना रस्त्यात अडवून आरोपींनी त्यांची दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेत बेदम मारहाण केली होती. त्यानंतर १६ मार्च रोजी पुन्हा रेल्वे स्थानक परिसरात माटेगाव येथील आत्माराम ज्ञानदेव बोबडे यांच्यावर हल्ला करून मोबाईल लंपास करण्यात आला होता. या दोन्ही घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आयुष राजेंद्र बरकुंटे (शास्त्रीनगर), अंकित संजय गायकवाड (भीमनगर) व श्रीनिवास रमेश गाडवे (कोळीवाडा) यांना अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सहा दुचाकी व सहा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, दुसऱ्या प्रकरणातील दोन आरोपींना सुगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पुणे येथे विक्रीस नेलेले पाच मोबाईल अझान मगदूम पठाण (ढोबी मोहल्ला) व राहुल थोरात (विजयनगर) यांच्याकडून हस्तगत करण्यात आले.अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन आरोपींना पाच दिवसांची, तर उर्वरित दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांमधून आणखी काही उलगडे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या कारवाईत फौजदार प्रकाश इंगोले, श्रीनिवास पडलवार तसेच पोलीस कर्मचारी शेख ताजुद्दीन, सुरेश राठोड, रमेश टोटेवाड, अजय माळकर, सुरेश चव्हाण, सुधीर काळे, माधव अक्कलवाड आदींनी मोलाचे योगदान दिले.

शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चोरी झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, तसेच वाहन पार्क करताना अतिरिक्त सुरक्षा उपायांचा अवलंब करावा. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी व्यक्त केले.










