पुर्णेत खाजगी सावकाराचा निर्घृण खून

Spread the love

दोन अज्ञात हल्लेखोरांकडून चाकूचे सपासप वार; गुड मॉर्निंग रोडवरील पहाटेची थरारक घटना, शहरात खळबळ

पुर्णा, ता.२२ (प्रतिनिधी) :

पुर्णा शहरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या एका थरारक खूनप्रकरणाने संपूर्ण शहर हादरले आहे. नियमित मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ४८ वर्षीय खाजगी सावकारावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात चाकूने सपासप वार करत निर्घृण खून केला. ही घटना शहरातील गुड मॉर्निंग रोडवर हिरो शोरूम ते राजमुद्रा चौक दरम्यान शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

देवराव बैजाजी साखरे (वय ४८, रा. धनगर गल्ली, पुर्णा, जि. परभणी) असे मृत खाजगी सावकाराचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, देवराव साखरे हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. दरम्यान, गुड मॉर्निंग रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि कोणतीही संधी न देता सिनेस्टाईल पद्धतीने चाकूने पोटावर व हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे साखरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, तर हल्लेखोर क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पुर्णा पोलिसांना कळविले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, फौजदार प्रकाश इंगोले, पोलीस कर्मचारी शैलेश टाकरस व बालाजी शेंबेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील देवराव साखरे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आर्थिक व्यवहार, सावकारीतील वाद किंवा पूर्ववैमनस्य या अनुषंगाने पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. भर सकाळी वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मृत देवराव साखरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.

नव्या पोलीस निरीक्षकांना सलामी.!

पुर्णा पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी स्वीकारला असतानाच शहरात घडलेल्या या निर्घृण खूनप्रकरणाने पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवसाढवळ्या मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याने शहरातील वाढती गुंडगिरी, अवैध धंदे आणि गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे. शहरात फोफावलेल्या गुन्हेगारी साखळीवर नव्या पोलीस निरीक्षकांकडून कशाप्रकारे लगाम लावला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page