पूर्णेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

Spread the love

भव्य शोभायात्रा, ढोल ताशांच्या गजराने शहर दुमदुमले

पूर्णा, ता. ५ (प्रतिनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती पूर्णा शहरात बुधवारी मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. धनगर समाज बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शहरातून ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात तसेच विविध धार्मिक सजीव देखाव्यांनी सजलेली भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात येथील धनगर गल्लीतील खंडोबा मंदिर परिसरातून करण्यात आली.याप्रसंगी शिवाचार्य गुरु नंदिकेश्वर महाराज, आ. गुट्टे मित्र मंडळाचे नितीन कदम, भाजपचे आनंद बनसोडे, नगरसेवक लक्ष्मीकांत कदम तसेच कार्यक्रमाचे संयोजक विश्वनाथ होळकर, भगवान सोळंके, राजू सोळंके, किशोर सूर्यवंशी, गोविंद ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या अश्वारूढ रथातील प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या आदर्श विचारांचे स्मरण केले.

ही शोभायात्रा खंडोबा मंदिर येथून सुरू होऊन महादेव मंदिर, महाराणा प्रताप चौक, जागीरदार चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, बसवेश्वर चौक आदी प्रमुख मार्गांवरून मोठ्या उत्साहात मार्गक्रमण करत जुना मोंढा येथील श्रीराम मंदिर परिसरात समाप्त झाली. शोभायात्रे दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक विश्वनाथ होळकर, अध्यक्ष शिवराज गाढवे, नवनाथ रावडले, ओमकार वाळवंटे, साई होळकर, अशोक जडगे, दुर्गादास पिसाळ, ओमराज वाळवंटे आदींसह जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page