ओव्हरलोड हायवा दुभाजकावर आदळला; समृद्धीच्या टिप्पर चालकांचा पुर्णेत हैदोस..!

Spread the love

वाहतूक नियम धाब्यावर; आरटीओ-पोलीस मात्र ‘चिडीचूप’, नागरिकांत संताप

पुर्णा | प्रतिनिधी

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड हायवा टिप्परचा बेफाम वेग पुन्हा एकदा समोर आला असून, भरधाव धावणाऱ्या एका टिप्परने पुर्णा शहरातील ताडकळस टिपाॅईन्ट येथील रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी (ता.३) मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दुभाजकासह वाहनाचे नुकसान झाले. या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्पर चालकांचा वाढता उपद्रव आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या कामासाठी खदानीतून मुरूम घेऊन झिरो फाटा रस्त्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या हायवा टिप्पर (क्र. एमएच-२६ सीव्ही-५५५६) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मध्यरात्रीच्या सुमारास टिपाॅईन्टवरील दुभाजकाला जोरदार धडक बसली. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे, याच ताडकळस टिपाॅईन्ट परिसरात मागील आठ दिवसांत भरधाव टिप्परच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही ना वाहतुकीवर नियंत्रण, ना ओव्हरलोड वाहनांवर कारवाई — त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून पुर्णा शहर व परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून, परिसरातील खदानीतून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. अनेक टिप्पर ओव्हरलोड अवस्थेत भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळते. मात्र या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांनी अक्षरशः डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.सामान्य नागरिक घरबांधणीसाठी वाळू, गिट्टी किंवा मुरूम वाहतूक करताना पावती, वेळेचे बंधन आणि ओव्हरलोडच्या नावाखाली कारवाईला सामोरे जातात. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाते. मात्र समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्पर वाहनांना जणू ‘२४ तासांचे मोकळे परवाने’ दिल्याप्रमाणे वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे.

“या वाहनांना कायदा लागू नाही का?”, “ओव्हरलोड वाहतूक आणि बेफाम वेग असूनही कारवाई का होत नाही?”, “संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यात सहभागी तर नाही ना?” असे संतप्त सवाल आता नागरिकांकडून खुलेआम उपस्थित केले जात आहेत.दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अपघातांनंतरही प्रशासन जागे होत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत असून, ओव्हरलोड टिप्परवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

You cannot copy content of this page