भरधाव दुचाकीची प्रवासी अॅटोला धडक; चौघे जखमी

Spread the love

पूर्णा-नांदेड महामार्गावरील गौर शिवारातील अपघात; अॅटो उलटल्याने प्रवाशांमध्ये घबराट

पूर्णा, ता. ४ (प्रतिनिधी)
पूर्णा-नांदेड महामार्गावरील गौर गावाजवळ भरधाव दुचाकीने प्रवासी अॅटोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २२ एपी ४०८८ क्रमांकाचा प्रवासी अॅटो गौर येथून पूर्णाकडे प्रवासी घेऊन येत होता. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच २२ बीजे ९७३२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने अॅटोला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की अॅटो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अॅटो रस्त्याच्या मधोमध उलटला.या अपघातात अॅटोमधील एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना हात व नाकाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली.

घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सर्व जखमींना तातडीने पूर्णा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातातील दुचाकीस्वारावर पूर्णा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page