अष्टभुजा रुपातील महिषासुरमर्दिनीची दुर्मिळ मूर्ती सापडली
पुर्णा तालुक्यातील सुकी येथील शेतात फवारणी दरम्यान लागला शोध; महसूल, पोलीस प्रशासन दाखल
यादवकालीन शिल्पकलेचा नमुना असण्याची शक्यता; पुरातत्त्व विभागालाही देण्यात आली माहिती
पूर्णा, ता. ३ (प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे सुकी येथिल एका शेतकऱ्याच्या शेतात फवारणीचे काम सुरू असताना पाणी आणण्यासाठी शेतातील वगळीत गेलेल्या शेतकऱ्यांना ही मूर्ती दिसून आल्याची घटना शुक्रवारी (ता.३) जुलै रोजी उघडकीस आली असून, घटनास्थळी महसूल व पोलीस विभागाच्या पथकाने धाव घेऊन मुर्ती ताब्यात घेत पंचनामा केला आहे.याबाबत पुरातत्त्व विभागाला माहिती देण्यात आली आहे.
सुकी शिवारात शेतकरी बळीराम भिमराव रेनगडे यांच्या गट क्रमांक ४९ मधील शेतात शुक्रवारी शेत फवारणीचे काम सुरू होते.यावेळी शेतातील वगळीत रेणगडे यांना मातीत दगडावर कोरलेले अर्धवट शिल्प दिसून आले.या शेतकऱ्याने माती खोदुन शिल्प बाहेर काढताच ती पुरातन काळातील अष्टभुजा देवीची दगडी मूर्ती आढळून आले.घटनेची खबर गावात पसरताच परिसरात ग्रामस्थांनी विशेषत; महीलांनी पुजेसाठी एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला तातडीने कळवली.उप विभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर,ना.त. प्रशांत थारकर मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत स्थळ पाहणी व चौकशी केली. त्यानंतर सुदाम आश्रोबा खुणे (मंडळ अधिकारी, कात्नेश्वर), श्रीनिवास पडळवार (पोलीस उपनिरीक्षक), राजकुमार सिंगरवाड (ग्राम महसूल अधिकारी), सचिन ठेंगे (पोलीस पाटील, कौडगाव) अधिकाऱ्यांनी मूर्ती ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील आदेशापर्यंत सदरील मूर्ती दौलत सूर्यवंशी (पोलीस पाटील, सुकी) यांच्या ताब्यात देत या ऐतिहासिक मूर्तीबाबत पुरातत्त्व विभागालाही माहिती देण्यात आली आहे .पुढील तपासणी व अभ्यासानंतर मूर्तीचा कालखंड आणि ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होणार आहे.यावेळी ज्ञानोबा शेषराव काळबांडे, गणेश रामराव काळबांडे, भागवत बालाजी पांचाळ, प्रसाद डिसेंबर काळबांडे, रामेश्वर प्रल्हादराव काळबांडे यांच्यासह गावातील पंचलोक उपस्थित होते.
*महिषासुरमर्दिनीचे उग्र आणि कलात्मक स्वरूप*
दगडात कोरलेल्या या शिल्पात देवी उग्र रूपात दर्शविण्यात आली असून तिच्या खाली महिषासुराचा वध दाखवलेला आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूस सिंहाचे वाहन स्पष्टपणे कोरलेले दिसते, जे दुर्गामातेचे प्रमुख प्रतीक मानले जाते.अष्टभुजा देवीच्या हातात त्रिशूल, शंख, चक्र तसेच गदा किंवा खड्गासारखी विविध आयुधे दर्शविण्यात आली आहेत. देवीचा उग्र चेहरा, मोठे डोळे, उंच मुकुट आणि मागील बाजूस असलेले अर्धवर्तुळाकार प्रभामंडळ यामुळे मूर्तीचे शिल्पवैभव अधिक उठून दिसते. संपूर्ण मूर्तीवर सूक्ष्म कोरीव काम आढळून येत असून स्थानिक दगडात ती साकारण्यात आल्याचा अंदाज आहे.
*यादवकालीन शिल्पकलेचा प्रभाव*
प्राथमिक दृष्टीने शिल्पशैलीचा अभ्यास करता ही मूर्ती यादवकालीन इ.स. ११व्या ते १३व्या शतकातील असण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. काही वैशिष्ट्यांमध्ये राष्ट्रकूट किंवा चालुक्यकालीन प्रभावही जाणवत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सदरील मूर्ती अंदाजे ७०० ते ९०० वर्षे जुनी असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.मूर्ती तुलनेने चांगल्या स्थितीत असून काही भाग झिजलेले असले तरी मुख्य आकृती स्पष्टपणे दिसून येते. प्राचीन काळात या परिसरात मंदिर किंवा एखादी वास्तू अस्तित्वात असण्याची शक्यता यामुळे व्यक्त होत असून या दुर्मिळ ऐतिहासिक शोधामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.











