माखणी शिवारातून बैलजोडीची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा

Spread the love

पुर्णा,ता८(प्रतिनिधी) : पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील शेतकरी अर्जुन ईरबाजी कनकटे यांच्या मालकीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माखणी शिवारातील गट क्रमांक १७३ मधील शेतातील आखाड्यावर संबंधित बैलजोडी नेहमीप्रमाणे बांधून ठेवण्यात आली होती. गुरुवारी (दि. २) रात्री सुमारे ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून आखाड्यातून दोन बैल लंपास केले.
चोरीस गेलेल्या पशुधनामध्ये सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा तांबड्या रंगाचा बैल आणि ३५ हजार रुपये किमतीचा काळा-जांभळ्या रंगाचा बैल असा एकूण ७० हजार रुपये किमतीच्या बैलजोडीचा समावेश आहे. घटना लक्षात आल्यानंतर शेतकरी अर्जुन कनकटे यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार नागनाथ पोते पुढील तपास करीत आहेत. परिसरात वाढत्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page