आषाढी एकादशीनिमित्त पूर्णेत भव्य पालखी व रिंगण सोहळा

Spread the love

स्वा. सै. दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा उपक्रम; महिलांना महादेवाची मूर्ती भेट,;२५ जुलैला भक्तिमय सोहळा

पूर्णा, ता. २१ (प्रतिनिधी) :

आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान, पूर्णा यांच्या वतीने शनिवार,(दि. २५) जुलै रोजी शहरात भव्य पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी दिली.

पालखी सोहळ्याला सकाळी ८ वाजता नवा मोंढा बाजार, पूर्णा येथून प्रारंभ होणार आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि वारकरी दिंड्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने पालखी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गस्थ होईल. नवा मोंढा येथून सुरू होणारी पालखी महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव मंदिर, श्री गुरु बुद्धीस्वामी मठ संस्थान मार्गे जुना मोंढा येथे पोहोचेल. यानंतर तेथे पारंपरिक रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या वारीत प्रत्यक्ष सहभागी होणे अनेक भाविकांना शक्य होत नसल्याने, त्यांना आपल्या शहरातच वारकरी परंपरेचा आणि विठ्ठलभक्तीचा अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणारा हा सोहळा पूर्णा शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व माता-भगिनींना महादेवाची आकर्षक मूर्ती भेट म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून, शहर व परिसरातील वारकरी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केले केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वातंत्र्य सैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून, संपूर्ण शहरात जय्यत तयारी सुरू केली आहे.

You cannot copy content of this page