रेल्वेत विनातिकीट प्रवास भोवला;भरारी पथकाने ५१९ जणांना पकडले
अडीच लाखांचा दंड वसूल;२७ गाड्यांमध्ये ३१ तिकीट तपासनीसांकडुन कारवाई; सचखंड, देवगिरी, नांदिग्रामसह प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांची तपासणी
पुर्णा,ता.२१ (प्रतिनिधी) :
रेल्वेत विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी (ता.२०) जुलै रोजी द.म.रेच्या नांदेड विभागांतील विशेष भरारी पथकाने तिकीट तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ५१९ जणांना विनातिकीट अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून दंडात्मक कारवाई करत एकूण सुमारे २ लाख ५३ हजार १०५ रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे.द.म.रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे विनाटिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी विशेष मोहिम हाती घेतली होती.या मोहीमेला एकुण ३१ स्क्वॉड तिकीट तपासनीस सहभागी झाले होते. त्यांनी तब्बल २७ धावत्या रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी केली.यामध्ये सचखंड एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, नांदिग्राम एक्स्प्रेस, पनवेल एक्स्प्रेस, हडपसर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, काचेगुडा एक्स्प्रेस, रायचूर एक्स्प्रेस आदी महत्त्वाच्या गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली.दरम्यान विनातिकीट प्रवासाच्या (TWT) २८५ प्रकरणांमधून २ लाख २ हजार ८६५ ,अनियमित प्रवासाच्या (IRT) १७ प्रकरणांमधून ११ हजार ७९०, तर बुक न केलेल्या सामानाच्या (UBL) २१७ प्रकरणांमधून ३८ हजार १०५रुपये इतकी रक्कम दंड व भाडे स्वरूपात वसूल करण्यात आली.
______________________________
रेल्वे विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी नांदेड रेल्वे विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे., तसेच रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण करणे या उद्देशाने अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.त्यामुळे रेल्वेतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा.
–प्रदिप कामले. (विभागीय व्यवस्थापक नांदेड रेल्वे विभाग(द.म.रे)











