पाथरीत महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
पोलीस निरीक्षकांच्या बदलीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप
पाथरी, दि. २१ (प्रतिनिधी) :
पाथरी येथील पोलीस निरीक्षकांची बदली करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप करत महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि तलाठ्यांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
तहसीलदार नितीन गर्जे यांनी ९ जुलै रोजी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडल्यानंतर या प्रकरणात कारवाईस विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कारवाईदरम्यान महसूल कर्मचाऱ्याला वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.तहसीलदारांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकांची बदली करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी कार्यमुक्त होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार नितीन गर्जे यांनी स्पष्ट केले.











