गोदापात्रात आढळला ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह
पूर्णेतील पिंपळगाव (लिखा) शिवारातील घटना; चर्चेला उधाण; चुडावा पोलिसांत घटनेची नोंद
पूर्णा, ता. २२ (प्रतिनिधी) : पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (लिखा) शिवारातील गोदावरी नदीपात्रात एका ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सुरुवातीला आत्महत्या की घातपात, अशा विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, चुडावा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १६/२०२६ (कलम १९४ बी.एन.एस.एस.) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मृत युवकाचे नाव मधुकर डिंगाबर काळे (वय ३५, रा. विष्णुपुरी, ता. जि. नांदेड) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गंगाजीबापू यांच्या देवदर्शनासाठी आला होता. त्यानंतर गोदावरी नदीच्या घाटावर आंघोळीसाठी गेला असावा. पोहता येत नसल्याने अथवा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आला आहे.ही घटना दि. २१ जुलै रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी गंगाजीबापू परिसरातील गोदावरी नदीपात्रात घडली. याबाबतची माहिती रंगनाथ श्रावण मुळे (रा. आडगाव, ता. पालम) यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर चुडावा पोलिस ठाण्याचे कर्मचारी महादेव आगळे, दत्ता काकडे व चंद्रमुनी हानवते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काकडे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गोदावरी नदीपात्रात आंघोळ करताना नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.











