बुलेटस्वाराला थारने चिरडले?२८ वर्षीय तरुण जागीच ठार
पुर्णा-नांदेड रोडवरील गौर शिवारातील थरारक घटना; अपघात की घातपात; पूर्ववैमनस्यातून कट रचुन खुन केल्याची चर्चा, एक संशयिताला घेतले ताब्यात; चुडावा पोलिसांत १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
पूर्णा,ता.३१(प्रतिनिधी)
बुलेट वरुन जाणा-या एका २८ वर्षीय तरुणाला एका विना नंबरच्या थार वाहनाने पाठीमागून जोरदार धडक देऊन त्याच्या बुलेटसह फरफटत नेल्याची घटना धक्कादायक घटना पुर्णा-नांदेड रोडवरील गौर शिवारात शुक्रवारी (ता.३१) रोजी सकाळच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले असून,हि घटना पुर्व वैमनस्यातुन घडवून आणण्यात आली असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळाली आहे.याप्रकरणी चुडावा पोलीसांनी घटनास्थळावरुन एकाला पाठलाग करून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसांत रात्री उशिरा १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.

संतोष बालाजी सावळे (वय २८) रा.गौर ता.पुर्णा जि.परभणी असे घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.सदरील तरुण हा शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी सुमारे १०.वाजण्याच्या सुमारास परभणी येथील त्याच्या बुलेट (एम.एच-२२-९११३) या दुचाकी वरून पूर्णा दिशेने जात होता. पुर्णा-नांदेड रस्त्यावरील रायबा हॉटेलच्या पुढे व नॉव्हेल्टी बार अँड रेस्टॉरंटजवळ नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या थार वाहनाने त्याच्या बुलेटला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.काही नागरिकांनी त्याला उचलून नांदेड येथे उपचारासाठी हलवले परंतु तो मयत असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.घटनेची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे,सपोनि सुशांत किनगे, यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पहाणी केली.
दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष सावळे याचे काही महिन्यांपूर्वी गावातील काही तरुणांशी हाणामारी झाली असल्याचे सांगितले.या घटनेत गुन्हा दाखल केल्याने या गुन्ह्याचा राग मनात धरून गावातील काही जणांनी संतोष यास वाहनाने चिरडून मारण्याचा कट रचला असल्याचे त्यांनी सांगितले. मयताची आई शिलाबाई सावळे यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस ठाण्यात.रात्री उशिरा १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे व सपोनि.सुशांत किणगे हे करत आहेत.
“
सदरील घटने प्रसंगी चुडावा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पो.काॅ. चंद्रमुनी हानवते हे पुर्णा-नांदेड रस्त्यावरुन चुडावा कडे जात असताना त्यांनी हा प्रकार पहाताच संबंधित थार चालकाला वाहन थांबवण्याचा सांगितले परंतु त्यांनी वाहन न थांबवता वाहन पळवून नेले.धनगरटाकळी फाटा परिसरात सदरील वाहन रोखण्यात हानवते यांना यश आले.दरम्यान वाहनातील दोघे वाहन सोडून पळून जात होते. त्यापैकी सुधिर पारवे नामक ईसमाला हानवते यांनी पाठलाग करून ताब्यात घेत जेरबंद केले आहे. “











