रेल्वेच्या विशेष तपासणीत १,०८७ विनातिकीट व अनियमित प्रवाशांवर कारवाई

Spread the love

२९ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी; सुमारे ६ लाखांचा दंड वसूल, बिनतिकीट प्रवासाविरोधात नांदेड विभागाची धडक मोहीम

पूर्णा | प्रतिनिधी

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट व अनियमित रेल्वे प्रवासाला आळा घालण्यासाठी सोमवारी (ता. ३) विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या मोहिमेत विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट वापर, बुक न केलेले सामान तसेच रेल्वे डब्यांमधील अनधिकृत विक्री करणाऱ्यांसह एकूण १,०८७ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून सुमारे ६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली.

दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाने मुदखेड–मनमाड, पूर्णा–अकोला आणि परभणी–परळी या रेल्वेमार्गांवर पहाटे ४.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेसाठी ३२ तिकीट तपासणी पथके, १४९ तिकीट तपासणी कर्मचारी, १४ स्टेशन तपासणी कर्मचारी, ४ विभागीय वाणिज्य निरीक्षक तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) ३ कर्मचारी सहभागी झाले होते.

या संयुक्त पथकांनी २९ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवासाची ५१६ प्रकरणे, अनियमित प्रवासाची १५७ प्रकरणे आणि बुक न केलेल्या सामानाची ४१४ प्रकरणे आढळून आली. याशिवाय रेल्वे डब्यांमध्ये अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या ५ फेरीवाल्यांवर तसेच अस्वच्छता करणाऱ्या ४ व्यक्तींवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे तसेच सामानाचे नियमानुसार बुकिंग करून रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातही अशा विशेष तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page